बांधकाम कामगारांनो एजंटांना बळी पडू नका – आमदार अमोल खताळ

0
36

दोन हजार बांधकाम कामगारांना भांडी वाटप

संगमनेर / प्रतिनिधी
महायुती सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांचा बांधकाम कामगारांना लाभ देण्यात येत आहे. ही सर्व प्रक्रिया विनामूल्य राबविण्यात येत असून, बांधकाम कामगारांनी कोणत्याही एजंटांना पैसे न देता थेट महायुती जनसंपर्क कार्यालयाशी संपर्क साधून अर्ज भरावा, असे आवाहन आमदार अमोल खताळ यांनी केले.

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून शहरातील मातोश्री लॉन्स येथे शनिवारी (ता. 14) आमदार खताळ यांच्या हस्ते 2 हजार बांधकाम कामगारांना गृहपयोगी वस्तू संच देण्यात आले. या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी बांधकाम अधिकारी सौरभ हामंद, उदय सूर्यवंशी, प्रकाश भोसले, शेतकरी नेते संतोष रोहम, ज्येष्ठ नेते वसंत देशमुख, शिवसेनेचे जिल्हा संघटक विठ्ठल घोरपडे, तालुकाप्रमुख रामभाऊ राहाणे, राजेंद्र सोनवणे, शहरप्रमुख विनोद सूर्यवंशी, भाजप तालुका अध्यक्ष गुलाब भोसले, गोकुळ दिघे, भाजप शहराध्यक्ष पायल ताजणे, नगरसेविका साक्षी सूर्यवंशी, निमोण सरपंच संदीप देशमुख, पायल ताजने, तालुका अध्यक्ष कविता पाटील, संगीता पुंड, सपना जाधव, दिपाली वाव्हळ, अश्विनी कोल्हे आदी मान्यवर उपस्थित होते.

आमदार खताळ म्हणाले की, महायुती सरकारच्या माध्यमातून विविध योजनांचे फॉर्म भरण्यासाठी काही ठिकाणी एजंटांनी पैसे घेऊन फसवणूक केल्याच्या तक्रारी येत आहेत. अशा प्रकारांना बळी न पडता नागरिकांनी एक रुपयाही न देता आमदार अमोल खताळ जनसंपर्क कार्यालयाशी संपर्क साधून योजनांचे अर्ज भरावेत. तुमच्याकडे कोणी पैसे मागत असल्यास किंवा अडवणूक करत असल्यास गुप्तपणे माहिती द्यावी, संबंधितांवर फौजदारी कारवाई करण्यात येईल, असे इशाराही त्यांनी दिला.

केंद्रासह राज्यात महायुतीचे सरकार असल्यामुळे संगमनेरात विकासकामांमध्ये कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये महायुती सरकारच्या पाठीशी भक्कम उभे राहा. तसेच महायुती सरकाराच्या माध्यमातून लोककल्याणकारी योजनांचा लाभ देऊन सशक्त समाज निर्माण करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील प्रयत्नशील असल्याचा विश्वास आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केला.

6,144 लाभार्थ्यांना अर्थसहाय्य वाटप….
शैक्षणिक योजना: 5,841 लाभार्थींना एकूण 5 कोटी 72 लाख 27 हजार रुपये वितरित…..
आरोग्य योजना: 19 लाभार्थींना 6 लाख 72 हजार रुपये वितरित…..
सामाजिक योजना: 124 प्रकरणांमध्ये 29 लाख 25 हजार रुपये वितरित……
अर्थसहाय्य योजना: 60 लाभार्थींना 30 लाख 32 हजार रुपये वितरित…..
आतापर्यंत 13 हजार बांधकाम कामगारांना आमदार अमोल खताळ यांच्या सहकार्याने संगमनेर येथे गृहपयोगी वस्तू संचाचे वाटप…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here