संगमनेर नगरपालिकेत नगराध्यक्षांच्या पतीचा कथित हस्तक्षेप

0
29

कारवाई न झाल्यास जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागणार – महायुतीचा इशारा

संगमनेर/ प्रतिनिधी
संगमनेर नगरपालिकेच्या कारभारात नगराध्यक्षा मैथिली सत्यजित तांबे यांच्या पतीचा कथित हस्तक्षेप होत असल्याचा आरोप शिवसेना-भाजप महायुतीच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी मुख्याधिकाऱ्यांकडे महायुतीच्या शिष्टमंडळाने निवेदनाद्वारे केली आहे.

शासनाच्या धोरणानुसार महिलांना राजकारणात सक्रिय सहभाग मिळावा यासाठी महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमध्ये ५० टक्के आरक्षण देण्यात आले आहे. तसेच महिला पदाधिकाऱ्यांना स्वतंत्रपणे काम करता यावे यासाठी शासन निर्णय काढण्यात आला असून, त्यानुसार महिला पदाधिकाऱ्यांच्या पतीला संबंधित संस्थेच्या कारभारात हस्तक्षेप करण्यास मनाई आहे. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार नगरपालिकेच्या निवडणुकीपासून नगरपालिकेच्या दैनंदिन कामकाजात सत्यजित तांबे सातत्याने हस्तक्षेप करत असल्याचे दिसून येत आहे. ते नगरपालिकेत प्रत्यक्ष उपस्थित राहत असून अधिकारी व कर्मचाऱ्यांसोबत बैठकाही घेत असल्याचा आरोप महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. त्यामुळे नगरपालिकेच्या कारभारात त्यांचा प्रत्यक्ष सहभाग असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून नगराध्यक्ष पद रद्द करण्याबाबतचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवावा, अशी मागणी तक्रार अर्जात करण्यात आली आहे. महाराष्ट्र नगरपालिका व नगरपंचायत अधिनियम, १९६५ च्या कलम ४४ नुसार मुख्याधिकाऱ्यांना नगराध्यक्ष किंवा नगरसेवक यांची कोणतीही कृती कायद्याविरुद्ध आढळल्यास त्याबाबतचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्याचा अधिकार आहे.

या प्रकरणात राजकीय दबावामुळे कोणतीही कारवाई करण्यात आली नाही तर मुख्याधिकाऱ्यांविरुद्ध जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात येईल, असा इशारा शिवसेना महायुतीच्या नगरसेविका साक्षी सूर्यवंशी, शिवसेना शहरप्रमुख विनोद सूर्यवंशी, भाजप शहराध्यक्ष पायल ताजणे, अजित जाधव, विशाल एंगंदुल, शशांक नामन, अक्षय वर्पे, सिद्धार्थ तुरकने आणि अनिकेत चांगले यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here