बोटा येथे पुणे–नाशिक रेल्वेमार्गासाठी रास्ता रोको

0
45

मुख्यमंत्र्यांसमवेत बैठकीचे पालकमंत्र्यांचे आंदोलकांना आश्वासन

संगमनेर/ प्रतिनिधी
पुणे–नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेमार्ग हा सिन्नर, अकोले व संगमनेर मार्गेच जावा, या एकमुखी मागणीसाठी बोटा येथे विकास क्रांती सेना तसेच विविध संघटनांच्यावतीने सोमवारी (दि.१२) दोन ते अडीच तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. नीलम खताळ यांनी आंदोलनस्थळावरून थेट पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना फोन लावत मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक घडवून आणण्याचे साकडे घातले. त्यावर लवकरच कृती समितीची बैठक घडून आणू असे आश्वासन पालकमंत्र्यांनी आंदोलनकर्त्यांना भ्रमणध्वनीवरून दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

या आंदोलनात अकोलेचे आमदार डॉ. किरण लहामटे, आमदार अमोल खताळ यांच्या पत्नी नीलम खताळ, भारतीय किसान सभेचे राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले, सावंत यांच्यासह संगमनेर व अकोले तालुक्यातील विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी पुणे-नाशिक रेल्वेमार्ग सिन्नर, अकोले संगमनेर मार्गे गेला पाहिजे आणि देवठाण, संगमनेर व बोटा येथे रेल्वेस्टेशन झाले पाहिजे या मागणीवर आम्ही सर्वजण ठाम आहोत. तसेच जोपर्यंत मुख्यमंत्र्यांबरोबर रेल्वे कृती समितीची बैठक होत नाही तोपर्यंत हा रस्ता रोको आंदोलन मागे घेतले जाणार नाही. वेळप्रसंगी जेलमध्ये जाण्याची वेळ आली तरी आम्ही मागे हटणार नाही असा इशारा ज्येष्ठ नेते कारभारी उगले, जालिंदर वाकचौरे, बाजीराव दराडे, महेश नवले, जनार्दन आहेर, चंद्रकांत घुले, अजय फटांगरे, जालिंदर गागरे, किशोर डोके, गणपत फुलवडे, ज्ञानदेव गडगे, गौरव डोंगरे व सुहास वाळुंज यांनी दिला.

नीलम खताळ यांचा थेट पालकमंत्र्यांना फोन..
आमदार अमोल खताळ यांना रस्ता रोको आंदोलनासंदर्भात माहिती होती. परंतु ते अचानक मुंबई येथे गेले असल्यामुळे ते आंदोलनाला उपस्थित राहू शकले नाही असे आमदार खताळ यांच्या पत्नी नीलम खताळ यांनी आंदोलकांना सांगितले आणि यानंतर आंदोलनस्थळावरून थेट पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधत उपस्थित आंदोलकांच्या भावना त्यांना सांगितल्या. त्यानंतर मंत्री विखे पाटील यांनी महापालिका निवडणुका संपल्यानंतर लगेचच संगमनेर-अकोले रेल्वे कृती समितीची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत घेऊ असे आश्वासन दिले. पालकमंत्र्यांच्या ठोस आश्वासनानंतर आंदोलकांनी आपले रस्ता रोको आंदोलन मागे घेतले.

२० तारखेच्या आत संगमनेर व अकोले तालुका रेल्वे कृती समितीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेट घडवून आणावी
भारतीय किसान सभेचे राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधताना सांगितले, १ फेब्रुवारीला रेल्वे अर्थसंकल्प जाहीर होणार असल्याने २० तारखेच्या आत संगमनेर व अकोले तालुका रेल्वे कृती समितीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेट घडवून आणावी. तसेच मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली दिल्ली येथे जाऊन रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन पुणे–नाशिक रेल्वे मार्ग सिन्नर–अकोले–संगमनेरमार्गे नेण्याबाबत निवेदन द्यावे, अशीही मागणी त्यांनी केली.

मुख्यमंत्र्यांसोबत बैठक तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संगमनेरला प्रांताधिकारी कार्यालयात बैठक घेतली जाणार
संगमनेर–अकोले तालुक्यातील रेल्वे कृती समितीची २० तारखेच्या आत मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक घडवून आणावी, तसेच संगमनेर येथील प्रांताधिकारी कार्यालयात पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात यावी, अशी मागणी अकोलेचे आमदार डॉ. किरण लहामटे यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे आंदोलन स्थळावरून केली. त्यावर महापालिका निवडणूक संपल्यानंतर १६ तारखेला मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन तत्काळ बैठक आयोजित केली जाईल, तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सुद्धा संगमनेरला प्रांताधिकारी कार्यालयात बैठक घेतली जाईल असे आश्वासन पालकमंत्री विखे पाटील यांनी दिले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here