पडत्या काळात तुम्ही सर्व पत्रकारांनी खूप सहकार्य केले

0
153

आमदार अमोल खताळ; पत्रकारांचा केला सन्मान

संगमनेर : माझ्या पडत्या काळात तुम्ही सर्व पत्रकारांनी माझ्या बातम्या प्रसिद्ध केल्या, माझ्यावर विश्वास ठेवला आणि मला मोलाचे सहकार्य केले. त्यामुळे तेव्हाही मी तुमच्यासाठी तोच अमोल खताळ होतो आणि आज आमदार झाल्यानंतरही मी बदललेलो नाही. आजही मी तुमच्यासाठी तोच अमोल खताळ आहे, असे स्पष्ट मत आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केले.

मराठी पत्रकारितेचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त मंगळवारी (ता.६) संगमनेर येथे आमदार खताळ यांच्या कार्यालयात पत्रकार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास ज्येष्ठ पत्रकार किसन हासे, श्याम तिवारी, गोरक्षनाथ मदने यांच्यासह तालुक्यातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना आमदार खताळ म्हणाले, आज राजकारणापेक्षा अधिक तीव्र स्पर्धा पत्रकारितेमध्ये पाहायला मिळत आहे. संगमनेरमध्ये पत्रकारांना आता चांगले दिवस आले असून स्पर्धेमुळे पत्रकारांना मान-सन्मान मिळत आहे. पारंपरिक वृत्तपत्रांसोबतच छोटे-छोटे पोर्टल, युट्यूब चॅनल्स, डिजिटल माध्यमे यामुळे पत्रकारितेचे स्वरूप बदलले आहे. ज्यांनी काळानुसार हे बदल स्वीकारले, ते पत्रकार आज पुढे गेले आहेत. बातमीमुळे सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळतो. त्यामुळे माध्यमांनी कोणतीही बातमी देताना तिची योग्य शहानिशा करूनच ती प्रसिद्ध केली पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले. निवडणुकीत हार-जीत ही प्रक्रिया सुरूच असते. गेल्या वर्षभरात मला अनेक चांगले तसेच वाईट अनुभव आले. मात्र, कोणालाही जास्त काळ गुलाम ठेवता येत नाही, हे सत्य आहे.

माझ्याविरोधात एखादी बातमी आली तरी मी कधीही कोणत्याही पत्रकाराला फोन करून दबाव टाकत नाही. सोशल मीडियाच्या युगातही पारंपरिक पत्रकारिता टिकली पाहिजे. आज पत्रकारिता करताना अनेकवेळा दबाव, धमक्या आणि दमबाजीला सामोरे जावे लागते. मात्र, सत्य आणि समाजहिताची भूमिका घेणारी पत्रकारिता अधिक मजबूत झाली पाहिजे, असेही ते म्हणाले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्व पत्रकारांचा सत्कार करण्यात आला. तत्पूर्वी मदने, तिवारी, गौतम गायकवाड, संदीप वाकचौरे यांनी मनोगत व्यक्त केले.

आमदार होण्यापूर्वीचा आणि आमदार झाल्यानंतरचाही अमोल खताळ एकच आहे. कुणीही आले तरी मी प्रत्येकाला भेटतो. सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गी लावण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो. पत्रकारांच्या सुख-दुःखात मी नेहमी सहभागी असतो आणि भविष्यातही पत्रकारांसोबत ठामपणे उभा राहीन. – अमोल खताळ (आमदार संगमनेर विधानसभा)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here