कॉंग्रेसच्या बॅनरवर हकालपट्टी केलेले पदवीधर आमदार सत्यजित तांबे झळकले
संगमनेर : नगरपरिषद निवडणूकीत संगमनेरकरांची दिशाभूल केल्यानंतर पदवीधर आमदार आपल्या मामाच्या आशिर्वादाने संगमनेरमध्ये पुन्हा एकदा कॉंग्रेसच्या खांद्यावर बसण्याच्या तयारीत आहेत. ज्यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका केली, ज्यांची कॉंग्रेसने पक्षातून हकालपट्टी करण्यात आली त्यांनाच पक्षाच्या कार्यक्रमांच्या बॅनरवर झळकवले जाते. सुसंस्कृततपणाचा तोरा मिरवणाऱ्यांना राजकीय स्वार्थासाठी कसा बुरखा घालावा लागतो, हे आता उघड झाले असून पदवीधर आमदार सत्यजित तांबे यांचा खोटेपणा जनतेसमोर आला असल्याची टीका भाजपाचे सरचिटणीस संदीप घुगे यांनी केली आहे.
कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांना सल्ला देत संदीप घुगे म्हणाले, तालुक्यातील कॉंग्रेसच्या जुन्या आणि एकनिष्ठ कार्यकर्त्यांनी खऱ्या अर्थाने या गोष्टीची नोंद घेतली पाहिजे. तुमच्या राष्ट्रीय नेत्याचा अपमान करणार्या आणि पक्षश्रेष्ठींचा आदेश मोडणाऱ्या व्यक्तीला कॉंग्रेसचेच जेष्ठ नेते स्वतःचा भाचा आहे म्हणून पक्षाच्या अंतर्गत गोष्टी आणि कार्यक्रमात जे स्थान देतात हे कितपत योग्य आहे. स्वाभिमानी कार्यकर्ता हे नक्कीच सहन करणार नाही.
स्वतःचा राजकीय फायदा आणि अस्तित्वासाठी उड्या मारणारे संगमनेरच्या जनतेची मोठी फसवणूक करत आहेत. जनतेला वेठीस धरून त्यांच्या बदलत्या भूमिका तालुक्याच्या होणार्या नुकसानीला कारणीभूत ठरत आहेत. परंतु पद, पैसा आणि सत्तेची सवय लागलेल्या मामा-भाचे जोडीला त्यांची जागा दाखवणे गरजेचे आहे. संगमनेरच्या शहरी भागातील जनतेची दिशाभूल करण्यात त्यांना यश मिळाले असले तरी ग्रामीण भागातील मतदार याचे उत्तर नक्कीच देतील. असा विश्वास संदीप घुगे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे व्यक्त केला आहे.








