पिंपरणेच्या सरपंचासह काँग्रेस कार्यकर्त्यांचा आ. खताळ यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

0
100

जोर्वे गटात माजी आमदार थोरात यांना सलग दुसरा धक्का

संगमनेर : तालुक्यातील जोर्वे गट हा तसा माजी आमदार बाळासाहेब थोरात यांचा बालेकिल्ला समजला जात होता. याआधी झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये थोरात यांचेच वर्चस्व या गटात टिकून राहिले आहे, परंतु जसे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले तसे थोरातगटाला मोठी गळती लागल्याचे चित्र दिसत आहे. आमदार अमोल खताळ यांच्या उपस्थितीत संगमनेर येथील शिवसेना महायुतीच्या जनसंपर्क कार्यालयात जोर्वे गटात असणार्‍या पिंपरणे परिसरातील अनेक कॉंग्रेस कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे.

नुकताच आश्वी येथे राज्याचे जलसंपदा मंत्री आणि अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत वाघापूर येथील थोरात साखर कारखान्याचे माजी संचालक बाळासाहेब शिंदे यांसह समर्थक कार्यकर्त्यांनी थोरात गटाला सोडचिठ्ठी देत विखे गटात प्रवेश केला. या मोठ्या धक्क्यातून थोरात गट सावरत नाही तोच आता पिंपरणे येथील कामधेनू दूध संस्थेचे चेअरमन व दलित चळवळीचे नेते प्रकाश उर्फ काका गायकवाड यांच्यासह पिंपरणे ग्रामपंचायतीचे सरपंच नारायण मरभळ, ग्रा.पं.सदस्य उत्तम राहिंज, निलेश चत्तर, श्रीकांत बागुल, सामाजिक कार्यकर्ते राहुल बागुल, नानासाहेब गायकवाड, सुरेश गाडेकर, प्रशांत राहिंज, शुभम राहिंज यांनी जोर्वे परिसरात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून होत असलेल्या विकासकामांना व आमदार अमोल खताळ पाटील यांच्या विकासकामे करण्याच्या शैलीला प्रभावित होऊन शिवसेनेत प्रवेश केला आहे. हा प्रवेश थोरात गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

मागील जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये जोर्वे गटात जरी माजी आ. थोरात यांचे वर्चस्व कायम राहिलेले असले तरी आता तशी परिस्थिती नाही. आमदार अमोल खताळ यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांची मोठी फळी तालुक्यात उभी राहिली आहे. त्यांच्या विकासकामे करण्याच्या शैलीला प्रभावित होत अनेक नवतरुण कार्यकर्ते नव्याने जोडले जात असल्याचे दिसून येत आहे.

जोर्वे जिल्हा परिषद गटातील बरीचशी गावे ही राज्याचे जलसंपदामंत्री व अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शिर्डी मतदारसंघातील असून या गावांमध्ये विखे पाटील यांची मोठी ताकद आहे. त्यातच आता जोर्वे गटातीलच असलेल्या अंभोरे गणात थोरात यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना सोडचिठ्ठी देत आ. अमोल खताळ पाटील यांचे नेतृत्व स्वीकारल्याने झालेला हा प्रवेश थोरात गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला कालावधी असला तरी अजून जोर्वे गटात मोठ्या प्रमाणावर काँग्रेसचे माजी आमदार बाळासाहेब थोरात यांना मानणारे कार्यकर्ते काँग्रेसला सोडचिठ्ठी देत असल्याने आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीचे राजकीय समीकरण बदलणार आहे हे मात्र तितकेच खरे आहे.

भाजपचे अध्यक्ष गोकुळ दिघे यांचा मास्टरस्ट्रोक?

संगमनेर तालुक्यातील पिंपरणे येथील काँग्रेस कार्यकर्त्यांचा प्रवेश शिवसेनेत जरी झाला असला तरी हा भाजपचे अध्यक्ष गोकुळ दिघे यांचाच मास्टरस्ट्रोक असल्याची चर्चा परिसरात होत असून यातून भाजपचे अध्यक्ष गोकुळ दिघे यांची राजकीय मुत्सद्देगिरी सिद्ध होताना दिसत आहे. या प्रवेशाने आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांचे राजकीय समीकरण नक्कीच बदलणार असल्याचे बोलले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here