संगमनेरात मंदिराच्या सभामंडपात रक्ताच्या थारोळ्यात तरुणाचा मृतदेह आढळला; हत्येची शक्यता

0
51

संगमनेर : तालुक्यातील मांडवे बुद्रुक येथील शिवप्रभात ट्रस्ट मंदिराच्या सभामंडपात रविवारी सकाळी खळबळजनक घटना घडली. भाऊराव विठ्ठल बाचकर (वय ३१, रा. राहुरी) या तरुणाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळला. सकाळच्या वेळी दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी हा प्रकार पाहून पोलिसांना कळवले.

घटनेची माहिती मिळताच संगमनेरचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांच्यासह घारगाव पोलिसांचे पथक आणि ठसा तज्ञ तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पंचनाम्यादरम्यान मृत बाचकर यांच्या डोक्याजवळ मोठ्या प्रमाणात रक्त, तसेच एक दगड आणि तुटलेल्या बांगड्यांच्या काचा आढळल्या. या वस्तू पोलिसांनी जप्त केल्या असून, संशयाची सुई हत्येकडे वळली आहे.

बाचकर शनिवारी सायंकाळी लिंबफाटा येथून शिवमंदिराकडे आले होते. त्यांच्या मृत्यूमागे घातपात असल्याची चर्चा परिसरात आहे. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी संगमनेर येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवला आहे.

बाचकर यांचा मृत्यू खून आहे की अन्य कारणामुळे झाला, याचा सखोल तपास घारगाव पोलीस करत आहेत. शवविच्छेदन अहवाल आणि पोलीस तपासातून या प्रकरणाचे सत्य लवकरच उघड होण्याची अपेक्षा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here