संगमनेर : गेल्या दोन दिवसांपूर्वी उघडकीस आलेल्या घटनेने संपूर्ण तालुका हादरला. मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या तरुण महिलेवर पाणीपुरी दुकानदार आणि बेकरीवाला यांनी सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर तात्काळ पोलिसांनी दखल घेत पाणीपुरी दुकानदार आरोपी गणेश प्रजापति याला थेट राजस्थान राज्यातून अटक केली आहे. मात्र या गुन्ह्यातील दुसरा आरोपी अद्यापही फरारच आहे.
पकडलेल्या गणेश जैसाजी प्रजापति (वय २६ वर्ष, मूळ रा. मंडवारीया पोस्ट बरलूट, ता. जि. सिरोही, राजस्थान) आरोपीला शनिवारी जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तसेच पोलीस दुसरा आरोपी बेकरीवाला सैफुल्ला अबूतय्यब शेख याचा शोध सुरू आहे. दरम्यान पोलीस अधिकारी तपास करत असताना आरोपी प्रजापति याने त्याच्या मूळ गावी पळ काढल्याचे समजले होते.
१५ सप्टेंबरला घडलेल्या या प्रकाराला पीडित महिलेने १ ऑक्टोंबरला संगमनेरच्या घारगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनंतर वाचा फुटली होती. याप्रकरणी दोघां विरोधात भारतीय न्याय संहिता कलम ६४ (१), ३५१(१) (३), ३(५), अनुसूचित जाती व जमाती अधिनियम कलम ३(२) (५) अनुसार गुन्हा दाखल केला होता. संगमनेरचे पोलीस उपाधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे या प्रकरणी तपास करत होते.








