संगमनेरः सहकार क्षेत्रासाठी दिशादर्शक असलेल्या सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२५-२६ या आगामी गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ सोमवारी (०६ ऑक्टोबर) सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आला आहे.
काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य, माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि कांचनताई थोरात यांच्या हस्ते हा समारंभ पार पडणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे हे असतील. तसेच, आमदार सत्यजीत तांबे, माधवराव कानवडे आणि डॉ. जयश्रीताई थोरात यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. कारखान्याचे उपाध्यक्ष पांडुरंग घुले यांनी ही माहिती दिली आहे.
माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली थोरात कारखान्याने मागील गळीत हंगामात ८ लाख मॅट्रिक टनांपेक्षा अधिक उसाचे गाळप केले होते. शेतकरी, सभासद आणि कार्यक्षेत्राबाहेरील ऊस उत्पादकांचा कारखान्यावर मोठा विश्वास असून, या कारखान्याने सातत्याने ऊस उत्पादकांना सर्वाधिक भाव दिला आहे.
२०२५-२६ गळीत हंगामाच्या बॉयलर अग्निप्रदीपन पूजेचा मान कारखान्याचे संचालक आणि त्यांच्या सुविद्य पत्नींला मिळाला आहे. यात संचालक सतीश वर्षे व सुनिताताई वर्षे, रामदास धुळगंड व इंदुबाई धुळगंड, रामनाथ कुटे व अलकाताई कुटे, गुलाब देशमुख व उज्वलाताई देशमुख, अरुण वाकचौरे व विद्याताई वाकचौरे यांच्याहस्ते ही पूजा होणार आहे.
या कार्यक्रमाला संगमनेर तालुक्यातील अमृत उद्योग समूहातील विविध संस्थांचे पदाधिकारी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. तरी, सर्व शेतकरी, ऊस उत्पादक व सभासद यांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन संपूर्ण संचालक मंडळ आणि कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी केले आहे.








