Farmer Success Story : पारंपारिक शेतीला फाटा देतशेतकऱ्यानं फुलवलं नंदनवन, संत्र्याच्या शेतीतून लाखोंचा नफा, कसं केलं नियोजन ?

0
106

Farmer Success Story: पारंपारिक शेतीला फाटा देत शेतकरी आता आधुनिक शेतीकडे वळू लागले आहेत. अहिल्यानगरचा शेतकरी संत्र्याची शेती करत लाखोंचं उत्पन्न मिळवत आहे.

Farmer Success Story: पारंपारिक शेतीला फाटा देत शेतकरी आता आधुनिक आणि नगदी पीक देणाऱ्या शेतीकडे वळू लागले आहेत. थोडसं पाणी उपलब्ध असलं तरी चांगलं नियोजन केलं तर चांगल्या उत्पन्नाची पीक घेता येऊ शकतात, याचे उत्तम उदाहरण अहिल्यानगरच्या भोसे येथील अशोक टेमकर (Ashok Temkar) यांनी दाखवून दिले आहे. टेमकर यांच्याकडे असलेल्या संत्रा (Orange) बागेच्या शेतीतून ते चांगले उत्पन्न मिळवत आहेत. अडीच एकरवर असलेली संत्राबाग त्यांना वर्षाला दहा लाख रुपयांचा निव्वळ नफा देत आहे.

अहिल्यानगर (Ahilyanagar News) जिल्ह्यातील भोसेगाव या परिसरात साडेतीनशे ते चारशे मिमी पाऊस पडतो. कमी पाऊस असल्यामुळे या भागातील शेतकरी पारंपारिक खरीपाची पिके घेतात. मात्र मागील काही वर्षांपासून भोसे गावातील शेतकरी फळबागांकडे वळले आहेत. प्रत्येक शेतकऱ्याकडे छोटी-मोठी फळबाग आहे. यात, डाळिंब आणि संत्रा बाग या भागात जास्त पाहायला मिळते.

दहा लाख रुपयांचा निव्वळ नफा

अशोक टेमकर यांची 16 एकर शेती आहे. यातील अडीच एकरवर त्यांनी साडेसातशे संत्र्याची झाड लावली आहेत. बारा बाय बारा अंतरावर असलेल्या या संत्रा झाडांना सरासरी 40 ते 60 किलो संत्र्याचे उत्पन्न मिळत आहे. एक वेळेस पीक घेण्यासाठी साधारण अडीच ते तीन लाख रुपयापर्यंत खर्चही येतो. यावर्षी संत्रा बागेतून त्यांना दहा लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळाला आहे.

शेतकऱ्यांनी फळबागांकडे वळल्यास फायदा

परिसरात बागांची संख्या वाढल्यामुळे गावातच व्यापारी देखील तयार झाले आहेत. त्या परिसरातील बागांमध्ये मिळणारी फळे दर्जेदार असल्यामुळे त्यांना चांगली मागणी देखील आहे. मुंबई, दिल्ली या बाजारासोबतच दक्षिणेकडील बाजारातही या भागातील फळांना मागणी असते. सध्या चांगला भाव असल्यामुळे व्यापाऱ्यांना देखील चांगला नफा मिळत आहे. पारंपारिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना पिकासाठी खर्च केलेले पैसेही मिळणं अवघड होतं. त्यातच आधुनिक शेतीची कास धरत आपल्याकडे असलेल्या साधनसामग्रीच्या जोरावर चांगली पिके घेता येऊ शकतात आणि चांगलं उत्पन्नही मिळवता येतं. थोडं पाणी उपलब्ध असलेल्या शेतकऱ्यांनी आता फळबागांकडे वळल्यास त्यांचा फायदा होऊ शकतो, असे व्यापाऱ्यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here