संगमनेर : कंटेनरसारखी मोठी मालवाहतूक वाहने निष्काळजीपणे चालविल्याने गंभीर अपघातांचे प्रमाण वाढत आहे. याच निष्काळजी वाहनचालकामुळे संगमनेर-कोपरगाव रस्त्यावर झालेल्या अपघातात अर्जुन सचिन लोणारी (वय 21, रा. जोर्वे) या तरुणाचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर पोलिसांनी संबंधित कंटेनर चालकाला अटक केली आहे.
गुरुवारी दुपारी सव्वा दोनच्या सुमारास अर्जुन सचिन लोणारी हा युवक आपल्या दुचाकीवरून तळेगाव महाविद्यालयाकडे जात असताना तिगाव परिसरात समोरून येणाऱ्या कंटेनरने जोरदार धडक दिली. अपघात इतका भीषण होता की अर्जुन गंभीर जखमी झाला. त्याच्या डोक्याला झालेल्या जबर दुखापतीमुळे तातडीने त्याला संगमनेर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले.
या घटनेनंतर संदीप श्रीपत इंगळे (रा. जोर्वे) यांनी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी कंटेनर चालक अवनीश कुमार लक्ष्मण सिंग (वय 35, रा. बरहिया बरनलाल, जिल्हा मैनपुरी, उत्तर प्रदेश) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून त्याला अटक केली आहे.
पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार टोपले करीत आहेत.








