संगमनेर : तालुक्यातील चिखली ग्रामपंचायतीने नागरिकांच्या सुरक्षिततेस धोका निर्माण करणाऱ्या 33 केव्ही उच्चदाब वीज वाहिनी विरोधात ठाम भूमिका घेतली आहे. निळवंडे धरणातून संगमनेर शहराला होणाऱ्या पाणीपुरवठ्याच्या मुख्य पाईपलाईनवरून ही वाहिनी टाकली जात असल्याने मोठा अपघात होण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. याबाबत ग्रामपंचायतीने मुख्यमंत्र्यांकडे थेट पत्र पाठवून काम थांबवण्याची मागणी केली असून, दुर्लक्ष झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.
श्रमिक मिल्क अँड फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री या कंपनीला मे 2024 मध्ये चुकीने ना हरकत प्रमाणपत्र देण्यात आले होते. नंतर ग्रामसभेत हा ठराव रद्द करण्यात आला. तरीदेखील कंपनी व ठेकेदारांनी पोलिसांच्या मदतीने काम सुरू ठेवल्याचा आरोप ग्रामपंचायतीने केला आहे.
ग्रामस्थांनी पत्रात स्पष्ट केले आहे की, वीज वाहिनी जर पाईपलाईनवर कोसळली तर संगमनेर, अकोले आणि आसपासच्या हजारो नागरिकांच्या जिवितास गंभीर धोका निर्माण होईल. याशिवाय ही लाईन स्मशानभूमी, मंदिरे, घरांच्या वस्ती आणि गजबजलेल्या रस्त्यालगतून जात असल्याने सार्वजनिक सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. काही पोल रस्त्याच्या कडेला असल्याने वाहतुकीलाही अडथळा निर्माण होऊ शकतो.
फक्त चिखलीच नव्हे तर संगमनेर नगर परिषद, गुंजाळवाडी, राजापूर आणि धांदरफळ बुद्रुक ग्रामपंचायतींनीही ठराव मंजूर करून या प्रकल्पाला विरोध दर्शवला आहे. मात्र, अद्याप प्रशासनाने काहीही हालचाल केलेली नाही.
26 ऑगस्ट रोजी झालेल्या ग्रामसभेत ठराव करण्यात आला की, वस्तीजवळचे आणि रस्त्यालगतचे सर्व पोल 15 दिवसांत हटवले नाहीत, तर महावितरण कार्यालयावर मोर्चा, उपोषण आणि आंदोलन करण्यात येईल. तसेच यामुळे होणाऱ्या नुकसानीस जबाबदार संबंधित अधिकारी व कंपनी असेल, असा इशाराही ग्रामपंचायतीने दिला आहे.








