लोकशाहीचा कौल मान्य नसल्याने दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न; निषेध मोर्चात विखेंचा थोरातांवर घणाघात

0
69

संगमनेर : आमदार अमोल खताळ यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आज संगमनेरमध्ये मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात संगमनेर तालुक्यातील नागरिक आणि महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले. तसेच या निषेध मोर्चात भाजप मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील सहभाग घेत माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर जोरदार टीका केली.

बाळासाहेब थोरातांवर टीका करताना भाषणात विखे पाटील म्हणाले, विधानसभा निवडणुकीत सर्वसामान्य कार्यकर्ता असलेल्या अमोल खताळ यांनी केलेला पराभव पचवता येत नाही. लोकशाहीने दिलेला कौल यांना मान्य नाही. इतक्या वर्ष लोकशाहीच मान्य नव्हती.

काही दिवसांपूर्वी कीर्तनकारावर हल्ला करत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. आता आमदार अमोल खताळ यांच्यावर हल्ला केला. असे किती हल्ले तुम्ही केले तरी या तालुक्यातील जनता तुमच्या विरोधातच उभी राहणार आहे. असा विश्वास निषेध मोर्चातील भाषणात मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला.

कार्यकर्त्यांना सूचना देताना मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, होणाऱ्या हल्ल्यांचा फक्त निषेध आणि धिक्कार करून चालणार नाही. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये महायुतीचा भगवा झेंडा फडकवायचा आहे.

आजपर्यंत आम्ही संयम सोडला नाही. परंतु तशी जर वेळ आली तर जशास तसे उत्तर देण्याची ताकद आमच्यामध्ये आहे. संगमनेरच्या जनतेला माहित आहे यामागे खरा सूत्रधार कोण आहे. तालुक्यात दहशत निर्माण करण्यासाठी आम्ही आलेलो नाही. तर तालुक्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी, रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करण्यासाठी आणि तालुक्याच्या परिवर्तनासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. विधानसभा निवडणुकीत आम्ही दिलेला शब्द विसरलो नसल्याची ग्वाही यावेळी बोलताना मंत्री विखे पाटील यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here