संगमनेर : राज्यात भाकड जनावरांचा प्रश्न शेतकऱ्यांसाठी गंभीर बनला आहे. या पार्श्वभूमीवर संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांनी प्रांत कार्यालयावर भाकड जनावरांच्या प्रश्नावर आक्रमक होत मोर्चा काढला. यावेळी प्रांत अधिकाऱ्यांच्या दालनात वासरांना व गोऱ्यांना नेत शेतकऱ्यांच्या समस्या मांडण्यात आल्या.
शिवआर्मी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुक्यातून अनेक शेतकरी भाकड जनावरे आणि बछडे घेऊन सरकारच्या विरोधात घोषणा देत थेट प्रांत कार्यालयात घुसले. प्रांत अधिकाऱ्यांच्या दालनात प्रवेश करत शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत ठिय्या दिला. ‘गोवंश हत्या बंदी कायद्यात सुधारणा करा’, ‘भाकड जनावरे आमच्या शेतात नकोत’ अशा घोषणा देत शेतकऱ्यांनी प्रशासनाला यावेळी जाब विचारला.
यावेळी उपस्थित शेतकरी म्हणाले, भाकड जनावरांसाठी सरकारीने खरेदी योजना राबवावी, जनावरांना योग्य पद्धतीने संगोपन करण्यासाठी गोशाळा उभाराव्यात तसेच शासकीय केंद्र स्थापन करावीत. पशुपालक शेतकऱ्यांच्या दुधाला योग्य भाव मिळावा. अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.
शेतकऱ्यांनी सरकारकडे दिलेल्या जनावराच्या बदल्या त्यांना बाजार भाव नुसार भरपाई द्यावी, या योजनेची पारदर्शक व प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, मोकाट गुरांची योग्य ती व्यवस्था सरकारने करावी, जीवीत तथा वित्तहानी सरकारने भरून द्यावी अशा विविध मागण्या यावेळी शेतकरी बांधवांनी केल्या. या जनावरांचा वेळीच बंदोबस्त केला नाही तर शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची वेळ येईल. असे मत प्रशासनाला निवेदन देत शेतकऱ्यांनी मांडले.








