संगमनेरात डाळिंब हंगामात वाढले दरोडेखोरांचे सावट; व्यापाऱ्याला भरदिवसा लुटले

0
43

आश्वी : डाळिंब बागायतदार शेतकऱ्यांच्या वाढत्या उत्पन्नाची चाहूल चोरट्यांनी घेतल्याचे आणखी एक प्रकरण उघडकीस आले आहे. संगमनेर तालुक्यातील पिंप्री-लौकी अजमपूर येथील डाळिंब उत्पादक शेतकरी संतोष दातीर यांना रोख रक्कम देण्यासाठी आलेल्या कोल्हार येथील व्यापाऱ्याला भरदिवसा खळी-पिंप्री रस्त्यावर चौघा दरोडेखोरांनी अडवून लुटल्याची धक्कादायक घटना बुधवारी (दि. ६) घडली. या झटापटीत डाळिंब व्यापारी जखमी झाले असून, आश्वी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शेख इजाज लुकमान (वय २२, रा. कोल्हार, मूळ रा. सिल्लोड) हे डाळिंब व्यापारी श्रीरामपूर येथील व्यापारी प्रदीप पटेल यांच्याकडून १ लाख ५१ हजार २०० रुपयांची रोख रक्कम घेऊन पिंप्री-लौकी अजमपूर येथील शेतकरी संतोष दातीर यांना देण्यासाठी (एमएच १७-एडब्ल्यू ८५४२) या क्रमांकाच्या दुचाकीवरून निघाले होते.

दुपारी साधारण चारच्या सुमारास खळी-पिंप्री रस्त्यावरील खंडोबा मंदिराजवळ, काळ्या रंगाच्या दोन दुचाकींवरून आलेल्या चौघांनी लुकमान यांच्या दुचाकीला बाजूला दाबून पाडले. त्यानंतर पैशाची पिशवी हिसकावण्याचा प्रयत्न केला. व्यापारी लुकमान यांनी प्रतिकार केल्याने, आरोपींपैकी दोघांनी चाकूसारख्या धारदार हत्याराने त्यांच्या पाठीत वार केले आणि पैशाची पिशवी घेऊन पळ काढला.

जखमी लुकमान यांच्यावर स्थानिक दवाखान्यात उपचार सुरू असून, आश्वी पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत. या घटनेने डाळिंब हंगामात वाढणाऱ्या रोख व्यवहाराच्या पार्श्वभूमीवर परिसरातील शेतकरी व व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here