संगमनेर : शहरातील जिल्हा न्यायालयात काम करणाऱ्या शिपायावर किरकोळ कारणावरून दोन तरुणांनी हॉकीस्टिकने हल्ला केला. गुरुवारी (दि. १७) सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास मालदाड रोड परिसरात ही घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
प्रविण शंकर वेडे (वय ३३) असे जखमी शिपायाचे नाव असून ते दुचाकीवरून जात असताना आरोपी वैभव दिलीप बुरकुल (रा. मालदाड रोड, संगमनेर) आणि रोहित दारोळे (रा. बुद्धविहारजवळ) या दोघांनी त्यांच्या दुचाकीला कट मारला. यामुळे वाद झाला आणि वादाचे रुपांतर शिवीगाळ आणि मारहाणपर्यंत पोहचले.
वाद वाढल्यावर दोघांनी वेडे यांना शिवीगाळ करत तोंडावर आणि छातीवर मारहाण केली. त्यानंतर हॉकीस्टिक काढून त्यांच्या डोक्यावर जोरात वार केला, त्यामुळे ते गंभीर जखमी झाले.
या घटनेनंतर वेडे यांनी पोलिसांत तक्रार दिली. त्या आधारावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल भांगरे करत आहेत.
या हल्ल्यामुळे सरकारी कर्मचारी आणि सामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न निर्माण झाला आहे. प्रविण वेडे यांच्यावर झालेला हल्ला केवळ एका व्यक्तीवर नाही, तर कायदा-सुव्यवस्थेवर झालेला आघात मानला जात आहे. त्यामुळे या प्रकरणात आरोपींना कठोर शिक्षा मिळावी, अशी मागणी न्यायालयीन कर्मचाऱ्यांकडून तसेच स्थानिक नागरिकांकडून होत आहे.








