संगमनेर : घरकुल योजनेच्या नावाखाली खोट्या बनावनट पावत्यांच्या आधारे तालुक्यातील निमोण, शिबलापूर, माळवाडी, आश्वी भागात वाळू माफीयांनी मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा सुरुच ठेवला असल्याचे चित्र आहे. यामुळे परिसरातील नागरिक आणि वाळू माफियांमध्ये वाद-विवाद होत असल्याच्या घटना वारंवार घडत आहेत.
शिबलापूर गावच्या शिवारातील माळवाडी येथे प्रवरा नदी पात्रातून नियमबाह्य अटी शर्तींचा भंग करुन सर्रास वाळू उपसा चालू आहे. यासाठी खोट्या बनावट पावत्या वापरण्यात येत आहेत. घरकुल योजनेचा गैरफायदा घेऊन शिर्डी, अकोले, सिन्नर, श्रीरामपूर, कोपरगाव याठिकाणी वाळुचा पुरवठा केला जात आहे.
दरम्यान, या वाळू तस्करांकडून खोट्या कागदपत्रांच्या आधारे वाळू लिलाव आणि त्यासंबधिच्या पावत्या तयार केल्या आहेत. एकाच पावतीवर मर्यादेपेक्षा जास्त वाळू उचलली जात असल्याचे पाहायला मिळत आहे. एकाच पावतीवर जास्तीत-जास्त खेपा कशा करता येतील याचे पध्दशीर नियोजन या वाळू माफियांनी लावले आहे.
वाळू उपशासाठी ट्रॅक्टर, डंपर, जेसीबी, पॉकलेन मशीन यांसरखी वाहने वापरली जात आहेत. मोठ्या प्रमाणावर झालेल्या वाळू उपशामुळे प्रवरा नदीत २० ते ४० फुटांपेक्षा जास्त खोलीचे खड्डे पडले आहेत. यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या विहिरीतील पाण्याची पातळी कमी झाली आहे. रस्त्यावर वाहतूकीची समस्या निर्माण झाली आहे. यासंदर्भात स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे तक्रार करणार असल्याचे सांगितले आहे. प्रशासनाने एकूणच या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष घालावे अशी मागणी स्थानिक नागरिकांमधून होत आहे.








