संगमनेर : शहरात एसटीपी प्लांट उभारण्याचा काहींनी प्रयत्न सुरू केला आहे. मात्र प्रस्तावित जागा क्रीडांगणाची आहे, त्यामुळे नागरिकांचा त्याला विरोध आहे. तसेच हा प्लांट स्थानिकांना त्रासदायक ठरणार असल्याने तो इतरत्र हलविण्यासाठी आपण नागरिकांसोबत खंबीरपणे उभा राहणार असल्याचे आश्वासन आमदार अमोल खताळ यांनी दिले आहे.
दरम्यान, एसटीपी प्लांट जोर्वे नाका परिसरात होणार असल्याचे पदवीधर आमदार सत्यजित तांबे आणि त्यांचे सहकारी सांगत आहेत. मात्र त्याठिकाणी या प्लांटला स्थानिकांचा मोठा विरोध आहे. असे असताना प्लांट तिथेच होणार यासाठी का घाट घातला जातोय? असा सवाल आमदार खताळ यांनी उपस्थित केला. यासंदर्भातील जमीन खरेदी, ठेकेदार यासाठी हेतुपूर्वक काही गोष्टी केल्या जात असल्याचा आरोप आ. खताळ यांनी केला आहे.
“शहराच्या हितासाठी योग्य ते निर्णय घेणे गरजेचे आहे. केंद्रात आणि राज्यात महायुतीचे सरकार असल्यामुळे संगमनेरच्या विकासासाठी आवश्यक निधी मी निश्चितपणे उपलब्ध करून देणार आहे. मात्र यासाठी आगामी नगरपालिकेच्या निवडणुकीत विकासाभिमुख उमेदवारांना निवडून देणे महत्त्वाचे आहे,” असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. शहराच्या सर्वांगीण विकासाला गती देण्यासाठी आणि नागरिकांच्या समस्यांचे तातडीने समाधान करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
या पार्श्वभूमीवर एसटीपी प्लांटच्या स्थळाबाबत पुढील निर्णय काय घेतला जातो याकडे आता संगमनेरकरांचे लक्ष लागले आहे.








