संगमनेर – श्री स्वामी समर्थ मंदिर ते संतोषी माता मंदिर या मार्गावर म्हाळुंगी नदीवर नव्याने उभारण्यात आलेल्या पुलाला माजी केंद्रीय मंत्री दिवंगत बाळासाहेब विखे-पाटील यांचे नाव देण्यात यावे, अशी जोरदार मागणी संगमनेरकर नागरिकांकडून करण्यात येत आहे.
संगमनेर नगरपरिषदेच्या माजी नगरसेविका अल्पना तांबे यांच्यासह साईनगर व आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी केली असून त्यांनी यासंदर्भातील निवेदन जलसंपदा मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील आणि आमदार अमोल खताळ यांच्याकडे सादर केले आहे.
नवीन पूल उभारण्यात आल्यामुळे या भागातील रहिवासी, भाविक तसेच विद्यार्थीवर्गाला दिलासा मिळाला असून पूर्वी या ठिकाणी असलेला पूल अतिवृष्टीमुळे पुराच्या पाण्यात वाहून गेला होता. तो पूल दिवंगत बाळासाहेब विखे-पाटील यांच्या पुढाकाराने बांधण्यात आला होता. त्यामुळे नव्याने उभारण्यात आलेल्या पुलाला त्यांचेच नाव देऊन त्यांना आदरांजली वाहावी, अशी भावना नागरिक व्यक्त करत आहेत.








