आरटीओ कॅम्पवर आ. खताळ यांची अचानक धाड
संगमनेर प्रतिनिधी
संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथे उपप्रादेशिक परिवहन विभाग, श्रीरामपूर यांच्या वतीने दर महिन्याच्या प्रत्येक बुधवारी वाहन परवाना (लायसन्स) धारक व वाहनचालकांसाठी विशेष कॅम्प आयोजित केला जातो. या कॅम्पमध्ये अनेक एजंट सर्वसामान्य वाहनचालकांकडून अवाजवी पैसे उकळत असल्याच्या तक्रारी वाहनचालकांनी आमदार अमोल खताळ पाटील यांच्याकडे केल्या होत्या. या तक्रारींची गंभीर दखल घेत आमदार खताळ यांनी बुधवारी अचानक वडगाव पान येथील कॅम्पवर धाड टाकत परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरत एजंटांच्या माध्यमातून सुरू असलेल्या गैरप्रकारांबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.
तळेगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेअंतर्गत वडगाव पान साठवण तलावात आलेले पाणी तळेगाव सह २१ गावांना सोडण्याच्या कार्यक्रमासाठी आमदार अमोल खताळ गेले होते. पाणी सोडल्यानंतर संगमनेरकडे परत येत असताना वडगाव पान येथील आरटीओ कॅम्पमध्ये एजंटांच्या माध्यमातून वाहन चालकांची आर्थिक लूट होत असल्याच्या तक्रारींची पडताळणी करण्यासाठी आमदार खताळ यांनी कोणतीही पूर्वसूचना न देता कॅम्पला भेट देत धाड टाकली. अचानक आमदार खताळ आले असल्याचे पाहताच आरटीओ अधिकाऱ्यांची एकच तारांबळ उडाली.
शासनाच्या सेवांसाठी नागरिकांना एजंटांच्या दारात जावे लागणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. सर्वसामान्य वाहन चालकांची अडवणूक होत असेल तर ती तात्काळ बंद झाली पाहिजे. नागरिकांना तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचा त्रास होता कामा नये,” असे सक्त निर्देश उपप्रादेशिक परिवहन विभाग अधिकाऱ्यांना दिले. आमदार खताळ यांच्या या कारवाईचे वाहन चालकांनी स्वागत केले आहे.
वडगाव पान येथील आरटीओ कॅम्पच्या स्थळावरून आमदार अमोल खताळ यांनी थेट परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना फोन लावत परिवहन विभागाच्या कामकाजात सुधारणा होणेबाबत तसेच संगमनेर येथे परिवहन कार्यालय सुरू करणेबाबत विनंती केली. ज्या अधिकाऱ्यांबाबत तक्रारी आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे परिवहन मंत्र्यांनी आमदार अमोल खताळ यांना सांगितले.








